महाड प्रभुराम मंदिराला महाप्रलयाचा तडाखा
महाड सीकेपी समाजाचे वैभव असलेल्या प्रभुराम मंदिराला महाप्रलयाचा तडाखा. वेळीच लक्ष न दिल्यास मंदिर इतिहासजमा होण्याची भीती.
महाडमध्ये आलेल्या महाकाय पुराने महाड सीकेपी समाजाचे पुरातन ऐतिहासिक प्रभुराम मंदिरही ढासळू लागले आहे.पुराच्या पाण्याच्या प्रचंड वेगाने मंदिराची मोठी पडझड झाली आहे.मंदिरात सुमारे १२ ते १३ फूट पाणी शिरल्याने मंदिराचा मूळ ढाचा सरकला आहे. महाड सीकेपी समाजाचे धार्मिक, सांस्कृतिक वैभव टिकवून ठेवण्यासाठी प्रभुराम मंदिराचाही त्वरेने जिर्णोद्धार करणे आवश्यक आहे.
सुमारे दोन अडीचशे वर्षांपूर्वी महाड परिसरात मोठ्या प्रमाणावर कायस्थ समाज होता.महाड वीरेश्वर देवस्थानाप्रमाणेच महाडच्या प्रभुराम मंदिराचे ऐतिहासिक महत्व आहे. वीरेश्वर देवस्थानाचे मानकरी म्हणून पोतनीस व टिपणीस या कुटुंबाना मोठा मान होता.सीकेपी समाजाचे असलेल्या प्रभुराम मंदिराचे क्रांतीसूर्य सुरबानाना टिपणीस यांच्यासह अनेक दिग्गजांनी या मंदिराचे विश्वस्तपद भूषविले आहे.
महाडच्या प्रभुराम मंदिरात गेली अनेक वर्षे सीकेपी समाजाचे धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम होत आहेत. रामनवमी, नित्यपान, रामरक्षा,गुढीपाडवा ते रामनवमी असा नऊ दिवस चालणारा उत्सव,कृष्णजन्माष्टमी,हनुमान जयंती,सीकेपी संस्कृतीचे चैत्र गौरी पूजन,हळदीकुंकू, संक्रात,नवरात्र इत्यादी अनेक उत्सव गेली दीड दोन शतके नित्यनियमाने होत आहेत.
कराची सीकेपी समाजाची मदत. महाड परिसरातील सीकेपी समाजाचे धार्मिक, सांस्कृतिक वैभव जपणा-या या प्रभुराम मंदिराला १८८० साली तेव्हाच्या अखंड हिंदुस्थानातील व आता पाकिस्तानातील कराची सीकेपी समाजाने मदत दिल्याची नोंद आहे. कराची सीकेपी समाजाने १८८० साली १२०१ रुपयांची देणगी दिली व त्या देणगीतून मंदिराच्या पाठीमागील भाग बांधण्यात आला आहे.असे हे पुरातन मंदिर आज महाप्रलयाने खचले आहे. महाड सीकेपींचे वैभव असलेल्या या मंदिराची डागडुजी महाडमध्ये सीकेपी आधिवेशन झाले तेव्हा करण्यात आली होती.राजन टिपणीस अध्यक्ष असताना डागडुजी रंगरंगोटी करण्यात आली होती. परवाच्या महाप्रलयात मंदिरात शिरलेले पाणी, पाण्याचा प्रचंड वेग यामुळे मंदिराचा मूळ लाकडी गाभारा सरकला आहे.मंदिराचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.दोन दिवस मंदिर पूर्णपणे चिखलाने भरले होते.मंदिराचे अध्यक्ष रघुवीर देशमुख व सौ. देशमुख यांनी कामगारांच्या मदतीने स्वतः पुढे होऊन तो चिखल साफ करुन घेतला आहे.मंदिराची सध्याची अवस्था मात्र अतिशय भयानक आहे. त्वरेने दुरुस्ती न केल्यास मंदिर खचण्याच्या स्थितीत आहे. गेली दोन वर्षे आलेली कोरोना महामारी त्यामुळे फारसे कार्यक्रम होऊ शकले नाहीत. त्यातच मंदिर साफसफाई, पुजारी वेतन व अन्य खर्च जेमतेम करण्यात आले. आता मंदिराची अवस्था बिकट झाली आहे.कोरोना व नंतरच्या महाप्रलयाने महाड ज्ञातीबांधवांचेही मोठे नुकसान झाले आहे. त्यातून सावरायला बराच कालावधी लागणार आहे.परंतु ज्ञातीचे वैभव असलेले मंदिर तर उभे राहीले पाहिजे अशी सर्वसाधारण भावना आहे. महाडचे प्रभुराम मंदिर इतिहास जमा होण्या आधी समस्त सीकेपी समाजाने तसेच दानशूर मंदिराच्या जिर्णोद्धारासाठी सहाय्य करावे असे आवाहन मंदिराचे अध्यक्ष रघुवीर देशमुख यांनी केले आहे.
महाड सीकेपी समाजाची संस्कृती, श्रध्दा व वैभव जपण्यासाठी सहकार्याचे हात पुढे यावेत अशी हाक समस्त महाडकर सीकेपी देत आहेत.या महाप्रलयात मदत करण्यात आलेल्या रकमेपैकी काही रक्कम जिर्णोद्धारासाठी वापरावी असाही एक विचार पुढे येत आहे. -तुषार राजे.